पुढील पाच दिवसात तापमान घट
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात आता नैऋत्य मौसमी पावसाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्यात दरवर्षीपेक्षा साधारणपणे एक आठवडा उशीराने मान्सून येणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनच्या अनुषंगाने येत्या पाच दिवसात राज्यातील तापमानात लक्षणीय घट दिसून येणार आहे.
गेले काही दिवसांपासून वाढलेल्या उकाडय़ापासून आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू चार ते सहा अंशापर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरांनाही उकाडय़ापासून दिलासा मिळणार असून पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा आणि तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि आद्रता यांमुळे मुंबई आणि परिसरात उकाडा जाणवत होता. मात्र यंदा मोसमी पावसाचे आगमन काहिसे लांबण्याची शक्यता असली तरी आता काही प्रमाणात उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी हवा ढगाळ राहील तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
SL/KA/SL
25 May 2023