होळीच्या आधीच तापमानाचा पारा चढला
पुणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसानंतर संपूर्ण राज्यांतील नागरिकांना अनेक वर्षांनंतर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. अगदी मुंबईकरांनीही यावर्षी थंडीचा आनंद लुटला.
मात्र आता एकीकडे थंडी ओसरत असताना दुपारी तापमानाचा पारा वेगाने चढू लागला आहे.सर्वसाधारणपणे होळी नंतर तापमान वाढू लागते. मात्र यावर्षी होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा लक्षणियरित्या चढत आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या अनेक वर्षांतील फेब्रुवारीपेक्षाही अधिक उष्ण आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सकाळी ९ पर्यंत वातावणात चांगला थंडावा असतो. मात्र त्यानंतर दुपारी पारा ३५ अंश आणि त्याहून अधिक चढतो. तर संध्याकाळ नंतर वातावरण लक्षणिय थंड होऊन रात्री व पहाटे चांगली थंडी पडते. दिवस आणि रात्रीतील तापमानाच्या तफावतीमुळे आणि वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला,ताप या विकारांचा सामना करावा लागत आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच तापमानाचे विक्रम मागे पडू लागले असून उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. येत्या तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ संभवते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील स्थिती
उन्हाळा सुरू होण्याआधीच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत कमाल तापमान वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागांमध्येच कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. जळगाव सोडल्यास इतरत्र किमान तापमानही वाढत आहे. त्यामुळे राज्यभर उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे चित्र आहे.
SL/KA/SL
26 Feb. 2023