उच्चांकावरून सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरगुंडी
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capital) घटले. आजच्या व्यवहारानंतर बाजार भांडवल 303.59 लाख कोटींवर आले. बुधवारी, बाजार भांडवल 303.92 लाख कोटी इतके होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्ती 33 हजार कोटींची घट झाली.नफावसुलीमुळे शेअर बाजार घसरणीसह (Share Market Fallen) बंद झाला. बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
आज व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 440 अंकांच्या घसरणीसह 66,266 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 118 अंकांनी घसरून 19,699 अंकांवर स्थिरावला. आज एका क्षणी दिवसभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 920 आणि निफ्टी 264 अंकांनी घसरला होता. पण बाजार नंतर सावरला.
आजच्या व्यवहारात सन फार्मा 2.10 टक्के, टाटा मोटर्स 0.83 टक्के, भारती एअरटेल 0.69 टक्के, लार्सन 0.62 टक्के, इन्फोसिस 0.30 टक्के, टीसीएस 0.27 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 6.39 टक्के, टेक महिंद्रा 3.82 टक्के, नेस्ले 2.08 टक्के, बजाज फायनान्स 1.98 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले. तर फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी फार्माने 3.04 टक्क्यांची म्हणजे 440 अंकांची उसळण घेतली. निफ्टी फार्माचे सर्व 10 समभाग तेजीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.
SL/KA/SL
27 July 2023