महाराष्ट्राच्या कृषीकन्येचं यश
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात आणि महाराष्ट्रात पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीच्या तंत्रज्ञानामध्येही झपाट्याने बदल झाले आहेत. कृषी क्षेत्रात फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. पाश्चत्य देशांमध्ये शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर काही वर्षांपासून केला जाऊ लागला. या तंत्रज्ञानामुळे शेत कमी वेळेत फवारलं जायचं, रसायनांच्या संपर्कात येऊन विषबाधा होण्याच्या घटनाही कमी झाल्या. The success of the farmers of Maharashtra
पाश्चात्य देशात प्रसिद्ध झालेली हे ड्रोन तंत्रज्ञान महाराष्ट्रात यशस्वी होईल का असा प्रश्न ही सर्वसामन्यांना पडला. अशातच, ‘सलाम किसान’ या कृषीमंचाने ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करुन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्याअंतर्गत या कृषीमंचाने लीनता शेळके वाघमारे या ड्रोन पायलटला प्रशिक्षित केले आहे. अशा प्रकारचं ड्रोन प्रशिक्षण घेणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पाच दिवसांच्या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
लीनता शेळके वाघमारे यांना लहानपणापासून शेतीमध्ये सर होता. कृषी क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “शेतकऱ्याच्या कुटुंबातच लहानाची मोठी झाल्याने मला नेहमीच शेतीमध्ये रस होता. हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आता मी शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करू शकते. मी देशाच्या कृषीक्षेत्राला आपले योगदान देत आहे, याचा मला आनंद आहे.”
लीनता शेळके वाघमारे यांनी भविष्यातील शेतीसाठी एक अनुकरणीय उदाहरण सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश ड्रोन पायलट बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहेच, पण शेतीच्या भवितव्याला आकार देण्याच्या महिलांच्या क्षमतेचेही ते प्रतीक आहे.
ML/KA/PGB
12 Sep 2023