सोलापूरच्या जोडप्याची गोष्ट झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात
मुंबई, दि. 10 : सोलापूरच्या आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे या तरुण जोडप्याची प्रेमकहाणी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. ‘लव्ह यू मुद्दु’ या कन्नड चित्रपटात त्यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.कर्नाटकातील लोकप्रिय दिग्दर्शक कुमार एल. यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून, हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सिद्धू मुळीमणी आणि रेश्मा एल. दिसणार आहेत. त्यांच्या सोबत राजेश नटरंगा, तबला नानी आणि गिरीश सुब्बैया यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
सोलापूरच्या या जोडप्याची कथा सोशल मीडियावर लोकप्रिय झाली होती. आकाश आणि अंजली यांच्या नात्यातील प्रामाणिकपणा, संघर्ष आणि एकमेकांवरील निष्ठा पाहून दिग्दर्शक कुमार प्रभावित झाले. त्यांनी सांगितले की, “ही कथा केवळ प्रेमाची नाही, तर आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्येही एकमेकांना साथ देण्याची आहे. ती प्रामाणिकता आणि भावना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.”
चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध सास्त्री यांनी दिले असून, छायाचित्रणाची जबाबदारी कृष्णा दीपक यांनी सांभाळली आहे. १२५ मिनिटांचा हा चित्रपट महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात विशेष उत्सुकतेने पाहिला जाणार आहे.
या चित्रपटामुळे सोलापूरच्या जोडप्याची कथा केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात पोहोचणार आहे. त्यांच्या संघर्षमय प्रेमकहाणीला आता सिनेमाच्या माध्यमातून अमरत्व मिळणार आहे.
SL/ML/SL