कोकणातील कातळशिल्पे २४ हजार वर्षे जुनी…

रत्नागिरी, दि. 22 : कोकणातील सड्यावर कोरलेली प्राचीन कातळशिल्पे (Geoglyphs जाग प्रसिद्ध आहेत. यांचा निर्मितीकाळ नुकत्याच समोर आलेल्या एका नव्या संशोधनानुसार ही कातळशिल्पे २४ हजार वर्षांपूर्वीची असू शकतात, ज्यामुळे ती जगातील सर्वात जुन्या ज्ञात शैलकला परंपरांपैकी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे, या कातळशिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा मिळण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. यापूर्वी कोकणातील कातळशिल्पांचे वय सुमारे 10 हजार वर्षे असल्याचा अंदाज होता. मात्र, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळोशी येथील गुहांमध्ये झालेल्या उत्खननात सुमारे 38 हजार वर्षे जुने सांस्कृतिक अवशेष मिळाले आहेत.
या पुराव्याच्या आधारावर, जागतिक वारसा स्थळांसाठी सादर केलेल्या कातळशिल्पांचे वय सुमारे 24 हजार वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ही कलाकृती ऐतिहासिक काळापर्यंत अस्तित्वात असावी, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
युनेस्कोकडे सादर केलेल्या अधिकृत माहितीपत्रकात कोकणातील कोरीव कामांची तुलना आंतरराष्ट्रीय स्थळांशी, जसे की पेरूच्या ‘नाझका लाईन्स’ आणि चिलीमधील ‘अटाकामा जायंट’ यांच्याशी करण्यात आली आहे. ही कातळशिल्पे आकाराने लहान असली तरी ती अधिक गुंतागुंतीची आहेत. येथील शिल्पांमध्ये गेंडा आणि पाणघोडा यांसारख्या प्राण्यांचे चित्रण आहे, जे हजारो वर्षांपूर्वी या प्रदेशातून नामशेष झाले होते.
कोकणातील आठ आणि गोव्यातील एका ठिकाणासह एकूण नऊ कातळशिल्प स्थळांचा या माहितीपत्रकात समावेश आहे. यामध्ये रत्नागिरीजवळच्या देवाचे गोठणे येथील एका मानवी आकृतीला ‘विचित्र चुंबकीय विचलना’ची नोंद आहे, तर बारसू येथील एका कोरीव कामामध्ये दोन वाघांनी वेढलेल्या मानवाची आकृती हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांप्रमाणे दिसते.