राज्यातील होर्डिंग्ज धोरणात सुधारणा होणार
 
					
    मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि राज्यातील धोकादायक असणारी एक लाख 9387 होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येत आहे अशी माहिती नगर विकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. या संदर्भातील प्रश्न योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. त्यावर अतुल भातखळकर, अमित साटम, विजय वडेट्टीवार आणि वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.
राज्यात आतापर्यंत नऊ हजार 26 होर्डिंगचे ऑडिट पूर्ण झाले असून ऑडिट साठी सहकार्य न करणाऱ्या आणि अधिकृत होर्डिंग बांधणाऱ्या 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असेही सामंत यांनी यावेळी सांगितलं. यावर्षीपासून दरवर्षी पुन्हा होर्डिंगचे ऑडिट केलं जाईल आणि या वर्षीची सुरुवात या अधिवेशन कालावधीनंतर लगेच सुरू करण्यात येईल असंही सामत यांनी सांगितलं. दर तीन महिन्यातून एकदा अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांनी याचा आढावा घ्यायचा आहे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचही सामंत यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं.
पार – गोदावरी योजनेचे पाणी मराठवाड्यात
पार – गोदावरी या एकात्मिक नदीजोड प्रकल्प योजनेसाठी एकूण 30 वळण योजना प्रस्तावित असून त्यातील 11 योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत तर आठ योजनांवरील काम सुरू आहे अशी माहिती गोदावरी कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता त्यावर कैलास पाटील यांनी उपप्रश्न विचारले.
काही योजनांवरील सर्वेक्षणाचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचं नियोजित होतं मात्र आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त झाल्यामुळे हे सर्वेक्षण येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येऊन ९.७६ टीएमसी इतकं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून ते मराठवाड्यापर्यंत पोहोचवले जाईल अशी माहितीही विखे पाटील यांनी यावेळी दिली.
ML/ML/SL
7 March 2025
 
                             
                                     
                                    