मनसेच्या गुंडागर्दीवर राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी
मुंबई, दि. 4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) – राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांकडून भाषेच्या व प्रांताच्या नावावर परप्रांतीय नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना मारहाण करून संविधानाच्या कलम 14 आणि 15 चा भंग केला जात असल्याचा आरोप करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी केला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सेंगर म्हणाले, “संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. देशाच्या आठव्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये हिंदीचाही समावेश असून, ती राष्ट्रीय पातळीवर दुवा भाषा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी भाषेचा विरोध करणे चुकीचे आहे. कलम 351 नुसार हिंदीचा विकास राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे, तर कलम 343 हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देते.”
सेंगर यांनी आरोप केला की, मुंबई आणि नवी मुंबईत परप्रांतीय नागरिकांना खासकरून लक्ष्य केले जात असून, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. “एखाद्याला मराठी भाषा येत नसेल, तर त्याला मारहाण करणे हा गुन्हा आहे. राज्य सरकारने याची त्वरित दखल घेतली पाहिजे आणि मनसेच्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करणी सेनेने केली आहे.