विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधिशांनी घेतले फैलावर
नवी दिल्ली,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर) : शिवसेनेच्या ठाकरे गटाने सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने विधाससभा अध्यक्षांना या प्रकरणी निर्णय घेण्यात होणाऱ्या विलंबावर चांगलेच खडेबोल सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील निकाल दिला होता. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे.
पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे न्यायालय विधानसभा अध्यक्षांचं आदर करतं, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतिष्ठा राखली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही निर्देश देतो की विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची सुनावणी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान न्यायालयाच्या कडक ताकीदीनंतर “माझ्याकडे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची कोणतीही प्रत आलेली नाही. जो पर्यंत प्रत प्राप्त होत नाही. त्याचा अभ्यास वाचन करत नाही. तोपर्यंत मी पुढील कोणतीही कारवाई सद्या करणार नाही. किंवा त्यावर भाष्य देखील करणार नाही”, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडले.
SL/KA/SL
18 Sept. 2023