ओ री चिरैया…

मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) : चिन्मयीने सांगितल्याबरोबर तिच्या बालवाडीच्या सगळ्या पोरांनी एका सुरात गायला सुरुवात केली-
चिव् चिव् चिम्…णी
खाते दाऽणा, पिते पाऽणी, बांधले घर्…टे, झाले उल्…टे
…
सगळ्यांचं गाणं नीट सुरू असताना पलाश मात्र अचानक कावराबावरा झाला. बाकीच्यांचं गाणं संपेतो, तो चांगलाच मुसमुसायला लागला.
“काय झालं रे एकदम?”- चिन्मयीने पटकन कडेवर घेत त्याला विचारलं.
गोबऱ्या गालात लपलेल्या शेंगदाण्याएवढ्या ओठातून कसेबसे शब्द उमटले – “मग.. चिऊताईचं घल्टं पल्लं नं..पिलाला बाऊ झाला असेल..”
चिन्मयीला काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईशी झालेलं बोलणं आठवलं. तक्त्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी भराभर नीट ओळखणाऱ्या पलाशला चिमणी कळलीच नव्हती. त्याची आई म्हणाली, “त्याने पाहिलीच नाही आहे खरी चिमणी कधी. आमच्या complex मध्ये येतच नाहीत. कबूतरं खूप येतात, ती ओळखतो तो बरोबर- रंग, आवाज, वास सगळं माहीत आहे त्याला. पण चिमणी दिसतच नाही. आम्ही तरी दाखवू कुठून?” चिन्मयी थक्क झाली. पण तिथेच न थांबता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पलाशला आणि त्याच्या आईला आपल्या घरी घेऊन गेली. कोपऱ्यावरच्या पिंपळाजवळ आले मात्र, तो इवलेसे कान टवकारून चाहूल घेऊ लागला. “काय वाजतंय?”
“अरे हाच तर चिऊतायांचा आवाज आहे. या बघ कित्ती आहेत!” आणि मुठीएवढ्या पक्ष्यांचा थवा बघून तो हरखूनच गेला. मग घरात जाऊन चिन्मयीने एका ताटलीत थोडे तांदूळ आणि थोडंसं पाणी आणलं. घरापासून थोडं लांब ठेवून म्हणाली, “आता बघ गंमत!” हे तिघे घरापाशी स्थिर उभे दिसल्यावर भुर्रकन एक चिमणी आली दाणा घेऊन गेली.. दुसरी आली पाण्यात चोच घालून गेली.. अन् तेव्हापासून पलाशची चिमण्यांशी गट्टी जमली.
गाण्यात, गोष्टीत, चित्रात सगळीकडे चिऊताईच हवीशी झाली. गाण्यातल्या त्या चिऊताईचं घरटं पडलं, पिलाला लागलं म्हटल्यावर तो बावरला, इतकी ती त्याच्या जवळची झाली होती. वाढदिवसाला चिमणीच्या चित्राचा टीशर्ट मिळेपर्यंत बाबाच्या नाकी नऊ आले!
पलाशच्या आईबाबांनीही मग त्याचा चिऊताईचा छंद आपलासा केला. चिन्मयीने सुचवल्यावरून घरी एक बर्ड-फीडरदेखील आला. थोडी माहिती काढल्यावर कळलं की- मोबाइल टॉवरमुळे, रेडिएशनमुळे चिमण्यांना हानी पोहोचते. रात्रीच्या वेळेस चमकणारे दिवे, लांबवर झोत फेकणारे शक्तिशाली दिवे यांनी घरट्यात पक्षी अस्वस्थ होतात. पतंगाच्या मांज्यांमुळे त्यांचे चिमणेसे जीव धोक्यात येतात. कबूतरांमुळे त्यांच्या अन्नात स्पर्धा येते, शांतता जाते, घरट्यांच्या जागांवर अतिक्रमण होतं, त्यांना भीती वाटते. अशा कित्येक गोष्टी. मग रविवारी आवर्जून जवळपासच्या झाडांना, बागांना भेट द्यायचा त्यांचा शिरस्ताच झाला.
पलाशच्या बालवाडीतील श्रीश, काव्या आणि अनिका त्यांच्याच complex मधली होती. त्यांनाही चिमण्या दाखवायला नेतानेता मग या सगळ्या आईबाबांचा एक अनौपचारिक गट तयार झाला. आणखी काही लोक जोडले गेले. चक्क चिमण्यांवर चर्चा होऊ लागली.
एके दिवशी काव्याच्या आईबाबांनी ‘चिमणी दिन’ साजरा करण्याची कल्पना मांडली. भराभरा नियोजन होऊन, complex मधील सर्व घरी निरोप देऊन २० मार्चला सभागृहात सगळे जमले. बघितलं तर सगळीकडे चिमण्यांची छायाचित्रं, माहितीफलक, घरट्यांच्या प्रतिकृती, बर्ड-फीडर्स अशा कित्येक गोष्टी दिसत होत्या. शार्वी आणि अव्यानसारखी छोटी छोटी मुलं चिमणा-चिमणीच्या वेशभूषेत होती. बडबडगीतं, नृत्यं सादर करणाऱ्या चिमण्या जिवांना चिन्मयीच्या हस्ते बक्षिसं दिली गेली. सियाने धीटपणे जागतिक चिमणी दिनाची माहिती दिली. – २००६ मध्ये नाशिकचे मोहम्मद दिलावर यांनी ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची निसर्गप्रेमी संस्था स्थापन केली. तिच्याच पुढाकाराने २०१० पासून जागतिक चिमणी दिन सुरू झाला, म्हणजे एकप्रकारे या विचाराचा उगम भारतातला- हे ऐकून उपस्थितांना अभिमान वाटला.
एका पक्षिमित्रांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांनी याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन लोकांचं समाधान केलं. चिमण्या नाहीशा होण्याचे गंभीर परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतात, पिकांवर रोगराई वाढते, आणि अख्खी अन्नसाखळी असंतुलित होते – हे ऐकून लोक चकितच झाले.
त्यांना वाचवण्यासाठी आम्ही काय करू शकतो?
- प्रेम! चिऊवर प्रेम करा, तिला खायला द्या, पाणी ठेवा. तिच्या घरट्यासाठी, उडतानाच्या विसाव्यासाठी झाडं सांभाळा.
सर, कोणती झाडं? - छान प्रश्न. देशी झाडं लावा, त्यांना वाढू द्या. तुमच्या सोयीनुसार फांद्या संपवून खोड तासून नुसतं खांबासारखं शिल्लक ठेवू नका. त्याने झाड ठेवल्यासारखं दाखवून तुम्ही कायद्यातून वाचाल, पण चिमण्या आणि तसे छोटे पक्षी नाही वाचणार..
चर्चा पुष्कळ रंगली. कार्यक्रम छान झाला.
फलित काय ? या complex मधील माणसांनी सवयी बदलल्या. देशी झाडं लावली. हिरवाई जपली. दडपशाही करणाऱ्या पक्ष्यांना फुकट खाऊ घालणं बंद केलं. घरोघरी चिऊसाठी दाणा-पाण्याची सोय झाली. आणि सर्वांनी मनापासून घातलेल्या ‘अंगना में फिर आजा रे..’ या सादेला चिमण्यांनी हळूहळू प्रतिसाद द्यायलाही सुरुवात केली! आता तो परिसर समृद्ध होतो आहे आणि तिथल्या बालकांना कायमची ‘जेवण-पार्टनर’ मिळाली आहे.
PGB/ML/PGB
20 March 2024