नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळांवर विल्हेवाट लावावी

 नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळांवर विल्हेवाट लावावी

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क):
छोट्या व मोठ्या नाल्‍यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळावर विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाला दिले आहेत.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई शहर भागातील वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर धारावी नाला या ठिकाणांना आज भेट दिली. तसेच, नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी म्‍हणाले की, मुंबई महानगराची निचरा प्रणाली (ड्रेनेज सिस्टीम) ही नाल्यांवर आधारित आहे. प्रत्येक वर्षी पावासाळ्यापूर्वी नाल्‍यांची स्‍वच्‍छता, गाळ काढणे आदी कामे करावी लागतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने नाल्‍यातून गाळ काढण्‍याची कामे हाती घेतली आहेत. लहान – मोठ्या नाल्‍यातून गाळ काढण्‍यासाठी महानगरपालिका २३५ कोटी रूपये खर्च करणार आहे. पावसाळापूर्व उद्दिष्‍टापैकी आजमितीला सुमारे ३० टक्‍के काम झाले आहे. पावसाळा सुरू व्हायला अद्याप सव्वा महिन्‍यांचा कालावधी शिल्‍लक आहे. ठरवून दिलेल्‍या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे कामकाज सुरू आहे. उर्वरित सव्वा महिन्यांच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी पुढे म्‍हणाले की, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्‍या निर्देशानुसार, नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा, वजन मोजमाप, वाहतूक, विल्‍हेवाट यासंदर्भात प्राप्त होणाऱया सर्व चित्रफीतींचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. यानिमित्ताने गाळ उपसा कामांसाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर होतो आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे. महानगरपालिकेने नागरिकांसाठी ‘https://swd.mcgm.gov.in/wms2025’ या संकेतस्थळावर छायाचित्र / चित्रफीती उपलब्ध करून दिल्‍या आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्यांमधून गाळ उपसा कामांचे तपशील पाहता येतील. कोणताही अभिप्राय, सूचना किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील भूषण गगराणी यांनी केले.

मुंबईकर नागरिकांना आवाहन करताना श्री. गगराणी म्‍हणाले की, नागरिकांनी नाल्‍यात घनकचरा विशेषत: प्‍लास्‍टिक पिशव्‍या, बाटल्‍या, थर्मोकॉल आदी तरंगता कचरा टाकू नये. त्या घनकचऱयामुळे सांडपाण्‍याच्‍या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. नाल्याच्या दुतर्फा तसेच आजूबाजूच्‍या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्‍वत:च्‍या आणि मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता गृहित धरता प्‍लास्‍टिक / तरंगता कचरा हा कचराकुंडीतच टाकावा. दाट लोकवस्‍तीच्‍या ठिकाणी किंवा अन्य नागरी वसाहतींच्‍या ठिकाणी महानगरपालिकेने कचरा संकलनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी ठरवून दिलेल्‍या त्या ठिकाणीच कचरा टाकला आणि नाल्यात टाकला नाही, तर त्यांचे देखील या नालेस्‍वच्‍छता प्रयत्नांमध्ये मोठे योगदान लाभेल आणि महानगरपालिकेला मदत होईल, असे देखील महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी नमूद केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *