हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांची धक्कादायक एक्झिट

 हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांची धक्कादायक एक्झिट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीसाठी आज अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नाटक,चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमांत लीलया अभिनय करणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे (५७) यांचे आज सायंकाळी निधन झाले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी वर्षभरापूर्वीच मात करून पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा सूर्याची पिल्ले या आगामी नाटकाच्या तालमीचे फोटो समोर आले होते. मात्र आज त्यांनी धक्कादायकपणे आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली.

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं.

‘द कपिल शर्मा’ शो या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. कपिल शर्माच्याच ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कॅन्सर काळातील आठवणी सांगितल्या होत्या. चुकीच्या उपचारामुळे कॅन्सर बळावला, अशी माहिती त्यांनी दिली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X सोशल मिडियावर अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लिहिले आहे की, “रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली दैदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.”

SL/ML/SL

14 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *