विधी विद्यापीठातून कायद्यामागची भूमिका, समजून घेणे आवश्यक
![विधी विद्यापीठातून कायद्यामागची भूमिका, समजून घेणे आवश्यक](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/02/Justice-Khanna.jpg)
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधी कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्य यावर परिणाम होतो त्यामुळे विधी कारकीर्द हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं. नागपूरच्या वर्धा रोड स्थित वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ एम एन एल यु नागपूर, चा तिसरा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला होता या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून ते संबोधित करत होते.
याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई, कुलगुरू प्रा. (डॉ.) विजेंदर कुमार उपस्थित होते. या समारंभात, एकूण १५५ पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवीपूर्व पदव्या, २८ पदव्युत्तर पदव्या आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या. या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विश्वजीत राव आणि विद्यार्थिनीआकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विधी विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकीर्दीच विस्तीर्ण असे क्षेत्र खुले असून ते मध्यस्थी क्षेत्रात विशेषज्ञताप्राप्त करू शकतात तसेच एरोनॉटिकल लॉ, मेरीटाईम लॉ, कार्पोरेट लिटीगेशन या क्षेत्रातही आपले करिअर करू शकतात परंतु कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी कठोर मेहनती शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन या विद्यापीठचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दीक्षांत समारंभा प्रसंगी केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आणि उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. या दीक्षांत समारंभाला विधीक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ML/ML/SL
15 Feb. 2025