रिक्षा चालकाने प्रवाशाला परत केली १२ तोळे सोनं असेलेली बॅग

बदलापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. पण काहीवेळा अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील हा मोह टाळून प्रामाणिकपणे ज्याची वस्तू त्याला परत करतात. ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. बदलापुरातील अजय पाटेकर या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात सापडलेली १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना परत केलीये. या रिक्षा चालकाचं शहरात सर्वत्र कौतुक होतंय.
बदलापूरच्या दत्तवाडीत राहणाऱ्या वनिता पाथरे या आपल्या कुटुंबासह मुंबईकडे लग्नासाठी निघाल्या होत्या. त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं. मात्र काही वेळाने त्यांना आपल्या जवळ असलेली एक बॅग रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं.मात्र तोपर्यंत रिक्षा तिथून निघून गेली होती.
काळजीत पाथरे कुटुंबीयांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली. दरम्यान रिक्षा चालक अजय पाटेकर याने ती बॅग पोलिस स्टेशनमध्ये जमा केली होती.त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
SL/KA/SL
23 Dec. 2023