कोकणवासियांचा परतीचा प्रवास खड्ड्यांतूनच, महामार्गावर वाहनांच्या रांगा
अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणवासियांचा महत्त्वाचा असा सण मानला जाणाऱ्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करुन पुन्हा: एकदा कोकणवासियांचा परतीचा प्रवास हा खड्ड्यांतूनच झाला. त्यातच पावसाने देखील दमदार हजेरी लावल्यामुळे आणि रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांमुळे या प्रवासात मोठ्या प्रमाणात अडथळे झालेले दिसून आले.
या प्रवासात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करुन अनेक चाकरमानी रविवारी सकाळपासूनच परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र या परतीच्या प्रवासामध्ये त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
या दरम्यान मोठ्या प्रमाणात पडलेल्या महाभयंकर खड्ड्यांमुळे तसेच जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक ही पूर्णतः धिम्या गतीने सुरु होती. सुकेळी ते पेण वाशीनाका, रामवाडी येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच महामार्गावर ऐनघर गावाच्या हद्दीमध्ये एक ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती बस साईडपट्टीवरील असलेल्या चिखलात अर्धवट स्थितीत पलटी झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
दरम्यान महामार्गाचे नागोठणे ते सुकेळी दरम्यानचे एका लेनचे सिमेंटचे काम झाल्यापासून या रस्त्यावरुन अनेक वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्गावरील या महाभयंकर अवस्थेमुळे पुन्हा: एकदा यावर्षीही कोकणवासियांचा महामार्गावरील प्रवासाबाबत हिरमोड झाला असून मंत्र्यांनी मुंबई -गोवा महामार्गावरील रस्त्याला अक्षरशः केराची टोपली बनवली आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासियांकडून ऐकायला मिळत होत्या.
ML/KA/SL
25 Sept. 2023