रेस्क्यू करून सोडलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू…

 रेस्क्यू करून सोडलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू…

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या महाकाय बेबी व्हेल (Baby Whale fish) माशाला अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र हा व्हेल मासा बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा मृत अवस्थेत गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आला आहे.

बेबी व्हेल (Baby Whale fish) मासा किनाऱ्यावर आल्याचे वृत्त समजताच गणपतीपुळे येथील स्थानिक युवक, जिंदाल, कोस्ट गार्ड आणि मत्स्य विभागाच्या बोटी या माशाला वाचवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. वनविभागाच्या गिरीजा देसाई तसेच राजश्री कीर आदी प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक तासांचे हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले होते.

सोमवारी रात्री उशिरा या माशावर उपचार करण्यासाठी पुणे येथून तज्ञ डॉ. चेतन हेही दाखल झाले होते. या माशाला सलाइन लावून प्रतिजैविकांची मात्रा देऊन त्यानंतर त्याला पुन्हा मंगळवारी रात्री उशीरा पाण्यात सुमारे चार ते पाच किलोमीटर आत सोडण्यात आले होते.

सुमारे तीस तासांपेक्षा अधिक काळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालले. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर वनविभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, पोलिस आदी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. या माशाला पाहण्यासाठी तसेच त्याचे सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मात्र बुधवारी सायंकाळी हा बेबी व्हेल (Baby Whale fish) पुन्हा समुद्र किनारी मृतावस्थेत आढळला आहे.
दरम्यान आता या महाकाय तसेच शेकडो किलो वजन असलेल्या मृत व्हेल माशाची विल्हेवाट लावण्याचे आव्हान वन विभाग तसेच प्रशासनासमोर असणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *