खरी समस्या हीच की सगळे विसरतात …
मुंबई, दि. 31 (जाई वैशंपायन) : आपण अगदी उच्च सांस्कृतिक अनुभवाच्या अपेक्षेत चित्रपटगृहात बसलेलो असतो.. किंवा मग निखळ मनोरंजन करून घेण्यासाठी, चार क्षण आनंदात घालवण्यासाठी.. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मात्र अतिशय ओंगळ दृश्यात्मक अनुभव येतो. मग चित्रपट सुरू होतो, आपण ते विसरतो.. चित्रपटात काही दृश्यांमध्ये खाली बारीक अक्षरात इशारा येतो, तेवढं दृश्य संपलं की प्रेक्षक इशारा विसरतात. आपण मध्यन्तरापर्यंत येतो, तेव्हा काहीतरी चविष्ट खातापिताना कदाचित् पुन्हा तीच ओंगळ दृश्यफीत.. कित्येक जण जाहीर नापसंती दाखवतात.. चित्रपट सुरू होतो..सगळे विसरतात !
खरी समस्या हीच आहे! सगळे विसरतात- प्रत्येक पाकिटावर धोक्याचा सचित्र इशारा दिलेला असतो, तरी सगळे विसरतात. म्हणूनच, तंबाखूच्या विळख्यातून व्यसनी माणसे सहज सुटत नाहीत. आणि म्हणूनच दरवर्षी जागतिक पातळीवर तंबाखूविरोधी दिवस पाळावा लागतो.
आज ३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिवस. तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांमुळे आरोग्याला पोहोचणारी हानी अधोरेखित करण्यासाठी आणि लोकांना त्याबद्दल जागृत करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. त्या निमित्ताने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या व्यवसायवाढीसाठी लढवत असलेल्या क्लृप्त्याही समाजासमोर आणल्या जातात.
एकप्रकारे तंबाखूची महामारीच म्हणता येईल अशा या व्यसनाच्या विरोधात जागतिक आरोग्य संघटना काय करते, हेही या निमित्ताने सांगितले जाते. शिवाय, स्वतःच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी जनसामान्यांनी या बाबतीत काय केले पाहिजे, याचीही शिकवण या दिनानिमित्त दिली जाते. अशा दिवसाचा पायंडा पाडण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवले ते १९८७ मध्ये. आणि १९८८ च्या जागतिक आरोग्य संमेलनात, दरवर्षी ३१ मे ला जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळण्यासंबंधी ठराव पारित करण्यात आला. तंबाखूच्या महामारीकडे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परंतु प्रतिबंध करता येणाऱ्या आजार आणि मृत्यूकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे पाऊल उचलले गेले.
तंबाखू या वनस्पतीजन्य पदार्थातून मिळणाऱ्या निकोटिनची नशा चढते. त्यात अन्य रसायने मिसळून त्यातून तयार होणाऱ्या तंबाखूजन्य उत्पादनांमुळे माणसाला व्यसन लागते. कालान्तराने ठराविक वेळेला शरीरच निकोटिनची मागणी करू लागते. तंबाखू, गुटखा किंवा तत्सम पदार्थ खाणे, विडी, सिगारेट, चिरूट, हुक्का अशा माध्यमातून धूम्रपान करणे – इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची व्यसने लोक करतात. यातून त्यांना श्वसनविकार, घशाचा/फुफ्फुसाचा/तोंडाचा कर्करोग तसेच असे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. प्रत्यक्ष धूम्रपान न करताही सतत त्या धुरातच श्वसन करणाऱ्यांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते, हे आणखी धोकादायक.
अस्वच्छ दुर्गंधीयुक्त ठिकाणी काम करावे लागणारी माणसे, प्रचंड ओझी उचलणारे हमाल आणि अशी कष्टाची किंवा त्रासदायक कामे करणारी माणसे, शारीरिक कष्टांची जाणीव होऊच नये म्हणून तंबाखूचा आधार घेताना दिसतात. मात्र ते व्यसन त्या कष्टांपेक्षा घातक ठरणार असते, याची त्यांना कल्पना येत नाही. तेवढ्यासाठीच पाकिटावरील इशारे, चित्रपटातील सूचना आणि ओंगळ वाटणाऱ्या परंतु भयानकतेचा संदेश अचूक पोहोचणाऱ्या दृश्यफिती समाजापर्यंत पोहोचवल्या जातात.
बालके आणि किशोरवयीन मुलांमध्येही हे व्यसन दिसत असले तरी, त्यांची परिस्थिती थोडी वेगळी आहे. मित्रांकडून टाकल्या जाणाऱ्या दबावामुळे, बंडाचा झेंडा फडकावण्यासाठी किंवा मग वर्चस्वाच्या नि सामर्थ्याच्या खुळचट कल्पनांपोटी मुले या व्यसनाच्या विळख्यात अडकत जातात. तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादक कंपन्यांना फक्त अधिकाधिक खप आणि नफेखोरी दिसत असते. त्यामुळे, बालवयातच व्यसन लावून पुढे वर्षानुवर्षे गिऱ्हाईक म्हणून पकडून ठेवण्याच्या मनसुब्याने या कंपन्या काम करत राहतात. जाहिराती किंवा अन्य माध्यमांमुळे प्रभाव पडून मुले या डावाला बळी पडतात आणि जन्माचे नुकसान करून बसतात. १३-१५ वर्षे वयोगटाची जगभरातील ३.७ कोटी बालके या व्यसनाच्या आहारी गेली असल्याचे WHO च्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून बालकांना वाचवणे’ ही यावर्षीच्या तंबाखूविरोधी दिनाची मध्यवर्ती संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. ‘भावी पिढ्यांचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे आणि तंबाखूसेवनात सातत्यपूर्ण घट करत राहिले पाहिजे’, असा संदेश देण्यासाठी ही संकल्पना निवडण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे, समाजापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी जगभरच्या तरुणाईने पुढाकार घेतला आहे. यासाठी #TobaccoExposed हा हॅशटॅग तयार करून त्यावर त्या कंपन्यांची समाजविघातक विपणन तंत्रे सांगितली जात आहेत. इ-सिगरेट पिण्याचे बालकांतील वाढते प्रमाण आणि त्याचे धोके सांगण्यात येत आहेत.
अर्थात, असे कितीही हॅशटॅग येवोत, जनजागृती मोहिमा, भित्तिचित्रे, व्याख्याने, निबंध.. काहीही होवो, जोवर घरातील/जवळच्या मोठ्या माणसांचे व्यसन मुले बघतात, तोवर ती आज ना उद्या त्यांचे अनुकरण करणार, हे उघड आहे. तात्पर्य, बालकांना व्यसनाच्या विळख्यात अडकू न देण्यासाठी, मोठ्यांनीही व्यसनाधीन न होण्याचे सामाजिक दायित्व उचलले पाहिजे!The real problem is that everyone forgets.
ML/ML/PGB
31 May 2024