प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने दिले !
मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धूळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे .
नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा कोण?’ याचे उत्तर जनतेने दिले आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेसकडून जल्लोष
विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याबद्दल काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा करण्यात आला.
त्यानंतर पत्रकारांशी बोतलाना नाना पटोले म्हणाले की, पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा बालेकिल्ला आहे पण याच बालेकिल्ल्यात काँग्रेसने मागील वर्षी पदवीधरच्या निवडणुकीत पराभूत केले, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाची धूळ चारली.
विदर्भ काँग्रेस विचारांचाच
विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेस विचाराची राहिली आहे. विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करेल. भाजपाने या निवडणुकीत सर्व काही ठरवून केले, सत्तेचा दुरुपयोग केला. जो जिंकला तो आपला अशी भाजपाची भूमिका आहे.
भाजपा ने घर फोडले
नाशिकमध्ये काँग्रेसचे घर फोडण्याचे पाप भाजपाने केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला, सत्यजित तांबेला उमेदवारी द्या असे त्यांनी सांगितले असते तर आम्ही उमेदवारी दिली असती.
डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म भरताना घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप आहे. नाशिकच्या संदर्भात हायकमांडच निर्णय घेईल, असेही नाना पटोले म्हणाले.
ML/KA/SL
3 Feb. 2023