विश्वासदर्शक ठराव हरल्याने पदावरून पायउतार झाले या देशाचे पंतप्रधान
काठमांडू, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जगात सर्वत्र सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. भारताच्या शेजारील नेपाळमध्येही आता सत्ता पालट झाला आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना केला आहे. अखेर १९ महिन्यांनंतर त्यांचं सरकार आज कोसळलं आहे. ६९ वर्षीय प्रचंड यांना २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेत केवळ ६३ मतं मिळाली आहेत. अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १९४ मतं पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतं मिळवणं आवश्यक होतं.
नेपाळच्या कनिष्ठ सभागृहातील सर्वात मोठी पार्टी नेपाळी काँग्रेसबरोबर वाटाघाटी केल्यानंतर के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षाने सीएपीएन-यूएमएल विद्यमान सत्तारूढ युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळकडे (माओवादी सेंटर) केवळ ३२ जागा आहेत. तर सीएपीएन-यूएमएलकडे ७८ व नेपाळी काँग्रेसकडे ८९ जागा आहेत. त्यामुळे आता देशात नेपाळी काँग्रेस व सीएपीएन-यूएमएल हे दोन पक्ष मिळून सत्तास्थापन करतील. या दोन पक्षांकडे मिळून १६७ सदस्यांची ताकद आहे.
SL/ML/SL
12 July 2024