एका हापूस आंब्याची किंमत मिळाली तब्बल 1 हजार 8 रुपये

कोल्हापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरच्या शाहू मार्केटयार्ड मधे, आज हापूस आंब्याची पहिली आवक झाली. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचा पहिला लिलाव शाहू मार्केट यार्ड मधे आज पार पडला. पहिल्या लिलावात आंब्याला उच्चांकी दर मिळाला. सव्वा डझन आंबे असणाऱ्या पेटीला प्रसाद वळंजू यांनी 15 हजार 121 रुपयांची बोली लावली. एका हापूस आंब्याची किंमत 1 हजार 8 रुपये झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील म्हापन इथल्या रामचंद्र ठाकूर नावाच्या शेतकऱ्याच्या बागेतील आंब्याला विक्रमी दर मिळाला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मधे कोकणातील हापूस आंब्याचं आगमन झालय. कोकणच्या हापूसला फळांचा राजा अशी ओळख आहे त्यामुळ हापूस आंबा कधी बाजारात येतोय याची, आंबा प्रेमी नागरिक प्रतीक्षा करत असतात. आंबा प्रेमींची ही प्रतीक्षा आज पूर्ण झाली. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मधे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापन इथल्या रामचंद्र ठाकूर यांच्या बागेतील हापूस आंबे दाखल झालेत. बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांच्या हस्ते आंब्याचा लिलाव काढण्यात आला.
2100 पासून बोलीची सुरुवात झाली बघता बघता 15 हजारावर बोली गेली, 15 हजार 121 रुपयाला प्रसाद वंळंजू यांनी सव्वा डझन आंबे असलेली सर्वाधिक बोली लावत खरेदी केली. यंदाच्या हंगामातील हापूस आंब्याला उच्चांकी दर मिळालाय. येणाऱ्या काळात आंब्याचे दर टिकून राहतील आणि कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढेल असा विश्वास सभापती प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला.
मार्केट यार्ड मधील ओम फ्रुट्स या पेढीवर आंब्याचा सौदा झाला. विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी ठाकूर यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील, संचालक किशोर आहुजा, संचालक दिलीप पवार, सचिव जयवंत पाटील, उपसचिव गजानन पाटील, सहाय्यक सचिव तानाजी दळवी, रामचंद्र दाष्ट्रे यांच्यासह बाजार समितीचे संचालक अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.
ML/ML/SL
12 Feb. 2025