राज्यात वैद्यकीय उपकरणांची टंचाई किती , अध्यक्षांनी सरकारला विचारले
मुंबई दि ५ — राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये असणाऱ्या रुग्णालयात एमआरआय , स्कॅनिंग आणि डायलिसिस यंत्रांची किती कमतरता आहे याची माहिती हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात सादर करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. यासंबंधीचा प्रश्न साजिद पठाण यांनी उपस्थित केला होता, त्यावर हरीश पिंपळे,विजय वडेट्टीवार आदींनी उप प्रश्न विचारले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी सहभाग पद्धतीने ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अनेक ठिकाणी यापूर्वी निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आता यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे असं सांगितलं. राज्याला नुकतीच ९०० MBBS वाढीव जागांची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे, त्यामुळे वाढीव वैद्यकीय महाविद्यालये देखील सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितलं .
रासायनिक खतांमुळे पिण्याचे पाणी दूषित
राज्यातील सात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने दूषित होत आहेत, त्यामुळे ही खते वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येणे आवश्यक आहे असं पाणीपुरवठा खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. जे पाणी नमुने राज्य सरकारने घेतले , त्याची तपासणी केली त्यात ११.६२ टक्के नायट्रेट सापडले आहे, राज्यातील ६८२ गावात यामुळे पाणी शुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत अशी माहितीही पाटील यांनी दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता, मंत्र्यांच्या उत्तराला नाना पटोले, प्रशांत बंब यांनी हरकत घेत केवळ शेतकऱ्यांना दोष न देता प्रदूषण करणाऱ्या रासायनिक कारखान्यांना आवर घालावा अशी मागणी केली. आदित्य ठाकरे, नितीन राऊत आदींनी यावर उप प्रश्न उपस्थित केले होते.