काँग्रेसची निती इंग्रजांच्या तोडा आणि फोडा सारखीच
कोल्हापूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्रजांनी ज्याप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ नीती वापरली. त्यांचाच अंश असलेल्या कॉंग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याच धोरण आखल आहे. देव, देश आणि धर्म याबद्दल आस्था नसणाऱ्या कॉंग्रेसवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, उमेदवार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप अमल महाडिक आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते अश्वारूड शिवपुतळा देवून योगी यांचे स्वागत करण्यात आले.
योगी म्हणाले, २०१४ च्या आधी पाकिस्तानचे अतिरेकी कधीही देशात घुसायचे. देशात हल्ले व्हायचे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे सर्व बंद झाले. कारण हा नवा भारत आहे. ‘छेडेंगे नही, पर छाेडेंगे नही’असा हा भारत आहे. अयोध्येमध्ये कॉंग्रेसही राममंदिर बांधू शकली असती. परंतू त्यांनी ते बांधलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच राजकारण सिध्दांतावर आधारित होत. परंतू उध्दव ठाकरे या सगळ्यापासून दूर गेले.
राज्यात पुन्हा महायुती सत्तेवर आल्यानंतर मग गणपतीबाप्पाच्या मिरवणुकीवर, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणारे घरात बसतील. बाहेर आले तर ‘राम नाम सत्य है’ हे उत्तर प्रदेशचे सूत्र त्यांना लागू होईल. महायुती सत्तेवर आल्यावर विशाळगडावरील अतिक्रमणेही आपोआप निघतील, असंही योगी यावेळी म्हणाले.
ML/ML/SL
17 Nov. 2024