पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र आझाद मैदानात उद्याच्या सभेसाठी मंडप उभारणी सुरू


मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आंदोलकांनी मैदानात उद्याच्या सभेसाठी मंडप उभारणे सुरू केले आहे.
जरांगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढया प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आंदोलनासाठी योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील. या ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी.
सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर न्याय निर्णयामध्ये आंदोलनकर्त्यांसाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत अनुपालन आपण रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर करणे अनिवार्य आहे. त्याचे अनुपालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची अवमान होईल याची आपण नोंद घ्यावी.असे मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटलं आहे.

ML/KA/PGB 25 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *