विधानभवनात झाला विश्वचषक विजेत्या संघ खेळाडूंचा सत्कार

 विधानभवनात झाला विश्वचषक विजेत्या संघ खेळाडूंचा सत्कार

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी ट्वेण्टी पुरुष विश्वचषक क्रिकेट संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्बरे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या वतीने भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि आमदार यावेळी उपस्थित होते.

या चारही क्रिकेटपटूंनी आपले मनोगत व्यक्त करत या सत्कार समारंभाबद्दल आणि काल मुंबईकरांनी केलेल्या स्वागता बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अकरा वर्षानंतर विश्वचषक जिंकणं हे संपूर्ण संघाच्या मेहनतीमुळे शक्य झालं ,प्रत्येक खेळाडूंनं प्रत्येक सामन्यात दिलेल्या योगदानामुळे विश्वचषक जिंकल्याचं रोहित शर्मा याने यावेळी सांगितले.
काल अरबी समुद्राच्या बाजूला मुंबईकरांचा महासागर उसळला होता याचं काटेकोर नियोजन केल्याबद्दल यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात चार मुंबईकर खेळाडू होते याचा विशेष आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. सुर्यकुमारचा झेल कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षांचं हे खेळाडू प्रतीक आहेत असं सांगत यापुढेही विजयी पताका कायम फडकवण्यासाठी या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

राजकारण हे क्रिकेटसारखं आहे कधी कुणी कुणाची विकेट कधी घेईल हे सांगू शकत नाही आमच्या पन्नास जणांच्या संघानं घेतलेली विकेट कधीही कोणी विसरणार नाही असं मिश्कीलपणे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेट विश्वात कायमचं कोरलं गेलं आहे, त्याचा कमी बोलून जास्तीत जास्त कामगिरी करण्याचा पैलू असेल किंवा संघातील प्रत्येक खेळाडूचा कमावलेला विश्वास या गोष्टी रोहित शर्मा कडून राजकीय क्षेत्रातील लोकांनी शिकायला हव्यात असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मुंबई पोलिसांनी काल केलेल्या योग्य व्यवस्थापनाविषयी आणि शिस्तबद्ध मुंबईकरांविषयी त्यांनी कौतुक केलं.

मुंबईला वानखेडेपेक्षा एका मोठ्या स्टेडियमची गरज आहे, त्यादृष्टीनं राज्य सरकार आवश्यक ती मदत करेल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत खुमासदार भाषण केलं. सुर्यकुमार यादवनं झेल घेतला नसता तर आजचा दिवस आपण पहिला नसता असं पवार यांनी सांगितलं. यापुढे प्रत्येक ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामना बघताना रोहित शर्मा कायम लक्षात राहील असं अजित पवार यांनी सांगितलं.

ML/ML/SL

5 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *