मुंबई मनपा क्षेत्रात वाढले सरोगसीसाठी इच्छुक जोडप्यांचे प्रमाण

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवनशैलीतील बदल, ताण तणाव, विवाहाचे वाढते वय, करिअरचे वाढते महत्त्व आणि अन्य व्यक्तिगत कारणांमुळे देशात मुल न होणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम गर्भधारणेची (आय. व्ही. एफ) प्रक्रिया व उपचार घेतले जात आहेत. मात्र यामध्ये यश न आलेली काही जोडपी आता ‘सरोगसी’ या पर्यायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षभरात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरोगसीचे प्रमाण वाढताना आढळत आहे. प्रत्येक महिन्याला १० ते १२ इच्छुक जोडपी जिल्हा स्तरीय वैद्यकीय मंडळाकडे संपर्क साधत आहेत.
सरोगसीची नोंदणी आणि सरोगसीचे नियमन करण्यासाठी सध्या मुंबईत २७ नोंदणीकृत सरोगसी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून वंध्यत्वाने ग्रासलेल्या, सामान्य परिस्थितीत असणाऱ्या जोडप्यांना एक नवीन आशा दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरोगसी व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी नियमन) कायदा २०२१ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश डॉ. शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत.
भारतात साधारणतः प्रत्येकी हजार जोडप्यांमागे १८ जोडपी वंध्यत्वग्रस्त आहेत. मुंबईत नोंदणीकृत सरोगसी केंद्रातून इच्छुक जोडपी, इच्छुक महिला यांच्यासाठी एकूण ६६ वैद्यकीय संकेत प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर अत्यावश्यक प्रमाणपत्र आठ जणांना देण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेची एकूण २७ नोंदणीकृत सरोगसी केंद्रे आहेत. सरोगसी संबंधित प्रश्नांबाबत व मार्गदर्शनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. तसेच नोंदणीकृत सरोगसी केंद्रातून सरोगसी नोंदणी करावी, असेही आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.
SL/ML/SL
16 May 2024