या जपानी संस्थेला जाहीर झाला नोबेल शांतता पुरस्कार
स्वीडन, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोबेल शांतता पुरस्कार 2024 जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.
जगात अण्वस्त्रांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा म्हणतात. हे हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.
या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे.
मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
SL/ML/SL
11 Oct. 2024