कुणबी नोदींसाठी सगेसोयरे मसुद्याला कायद्याचे स्वरूप लवकरच

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुणबी नोंदी मिळालेल्या मराठा समाजासाठीच्या सगेसोयरे मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतला जाईल, असं सांगत प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
सगेसोयरे मसुद्यावर विविध आठ लाख हरकती प्राप्त झाल्या असून या हरकतींची छाननी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कुणबी नोंदी शोधण्याच्या दृष्टीनं हैदराबाद गॅझेटची मूळ प्रत मिळवण्यासाठी सगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्याचप्रमाणे यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सेवा निवृत्त न्यायाधीशांची समितिचा अभिप्राय घेतल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल , हा निर्णय घेण्यासाठी १३ जुलै पर्यंतचा वेळ आंदोलकांनी दिला असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र १० टक्के आरक्षण म्हणजेच एसईबीसी आरक्षण अधिनियम, २०२४ न्यायालयात टिकावं यासाठी सरकारच्या वतीनं न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे असं देखील शंभूराज देसाई यांनी सांगितलं. या आरक्षणाअंतर्गत सुमारे दीड लाख दाखले देण्यात आले असून २८ हजार दाखले प्रलंबित आहेत ते देण्यासाठी प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
ML/ML/SL
3 July 2024