फिलिपिन्समध्ये धडकलं या वर्षीचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

जगभरातील हवामान तज्ज्ञांनी ‘रागासा’ या चक्रीवादळाला २०२५ मधील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून घोषित केले आहे. हे चक्रीवादळ सध्या फिलिपिन्समध्ये धडकले असून, प्रति तास तब्बल २७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या प्रचंड वेगवान वादळामुळे फिलिपिन्सच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाने धोकादायक क्षेत्रातील सुमारे १०,००० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
वादळामुळे संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडित झाला असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रागासा चक्रीवादळाचा तडाखा केवळ फिलिपिन्सपुरता मर्यादित न राहता हाँगकाँग, तैवान आणि चीनपर्यंत पोहोचला आहे. तैवानने तातडीने सर्व विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, हाँगकाँगमध्ये पुढील ३६ तास कोणतेही विमान उड्डाण करणार नाही. चीनच्या किनारपट्टी भागातही वादळाचा प्रभाव जाणवू लागला असून, तेथील प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी या वादळाला ‘सुपर टायफून’ श्रेणीत वर्गीकृत केले असून, याचा प्रभाव पुढील काही दिवसांपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रागासा चक्रीवादळामुळे आशिया खंडातील अनेक देशांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कसोटी लागली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या तीव्र चक्रीवादळांची वारंवारता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.