अमूल गर्लच्या निर्मात्यांचे निधन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमूल बटर म्हटले की डोळ्यासमोर येते ती निळ्या रंगाचे केस, पांढरा आणि लाल डॉट फ्रॉक घातलेली खट्याळ, अवखळ अमूल गर्ल. या सर्वांच्या लाडक्या अमूल गर्लचे निर्माते सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे काल मुंबई येथे निधन झाले. अमूल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.’आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, काल रात्री मुंबईत डाकुन्हा कम्युनिकेशन्सचे चेअरमन सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले. ते भारतीय जाहिरात उद्योगातील एक दिग्गज होते. 1960 पासून अमूलशी जोडलेले होते. या शोकात अमूल परिवार सहभागी आहे. अशा शब्दांत अमूल व्यवस्थापनाने शोक संदेश लिहिला आहे.
अमूलची जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू झाली. बॉम्बे अॅडव्हर्टायझिंग एजन्सी अँड सेल्स प्रमोशन (एएसपी) यांना अमूलचे प्रमुख डॉ. वर्गिस कुरियन यांनी ब्रँड मोहिमेची जबाबदारी दिली होती. त्या काळी दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यमांवरील जाहिराती अत्यंत महाग होत्या. त्यामुळे जाहिरात एजन्सीचे क्रिएटिव्ह हेड सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी अधिक परवडणाऱ्या आऊटडोअर होर्डिंगसाठी जाहिरात मोहीम आखण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, युस्टेस फर्नांडिस एजन्सीमध्ये कला दिग्दर्शक होते, ज्यांनी सिल्व्हेस्टर डाकुन्हा यांच्यासोबत अमूल गर्ल तयार केली.
सिल्व्हेस्टरची पत्नी निशा डाकुन्हा यांनी अमूलला ‘अटरली बटरली अमूल’ ही टॅगलाइन दिली. ही टॅगलाइन भारतीय जाहिरातींच्या सर्वात अविस्मरणीय टॅगलाइनपैकी एक आहे. त्यावेळी अमूलची स्पर्धक पोल्सन बटरची ब्रँड ओळखही एक लहान मुलगी होती. त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी अमूल गर्ल तयार करण्यात आली. सिल्वेस्टर डाकुन्हा अमूलच्या यशामध्ये त्याच्या जाहिरात मोहिमेचा मोठा वाटा आहे. अमूल आपल्या जाहिरात मोहिमांमध्ये चालू घडामोडींशी संबंधित वन लाइनर देण्याबाबतही लोकप्रिय आहे. अमूल गर्ल जाहिरातीच्या यशानंतर डाकुन्हा आणि त्यांच्या टीमने टॉपिकल म्हणजेच वर्तमान घटनांवर अमूल गर्सच्या तोंडून मार्मिक टिप्पणी करणाऱ्या जाहिराती सुरू केल्या. या जाहिरातींमुळे डाकुन्हा याची अमूल गर्ल घरोघरी पोहोचली आणि अमूलचा ब्रॅण्ड ठसवण्यासाठीही ही अशा जाहिराती खूप उपयुक्त ठरल्या. आजही अमूल गर्ल वेगवेगळ्या सद्य घडामोडींवर भाष्य करून लोकांचे लक्ष वेधून घेते.
SL/KA/SL
21 June 2023