महायुतीला समर्थन देत महाविकास आघाडीने मिळून आरक्षण वर्गीकरणाचा जीआर काढला

 महायुतीला समर्थन देत महाविकास आघाडीने मिळून आरक्षण वर्गीकरणाचा जीआर काढला

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात जे मनुवादी सरकार आहे त्यांना समर्थन देणारे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांनी मिळून आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठीचा जीआर काढल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेयरच्या संदर्भात आणि वर्गीकरणासंदर्भात एक निर्णय दिला होता. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना क्रिमीलेयरमध्ये आणण्याची जी भूमिका आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवू शकते का संसद ठरवू शकते ? असा सवाल करत ॲड.आंबेडकर यांनी म्हटले की, आमच्या मते हे संसद ठरवू शकते. कोर्ट या संदर्भात काही बोलू शकत नाही त्यांना तो अधिकार नाही.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला पाहिजेत. पण त्यामध्ये ओबीसी आरक्षण नसले पाहिजे. काँग्रेसची आघाडी आणि भाजपची आघाडी ज्याला आपण मराठा खानावळ म्हणतो. त्यांचे एकच धेय्य आहे की, ओबीसींचे आरक्षण  संपवणे हीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी हे आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणार असे मला वाटते आणि तोच मोठा मुद्दा आहे.

जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाले पाहिजे. यावर वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणी भूमिका घेतली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. जरांगे पाटील यांनी आलेल्या 800 अर्जांपैकी 288 उमेदवार निवडावे आणि निवडणुकीत उतरावं आणि निवडणूक लढवावी असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आमचे जास्तीत जास्त उमेदवार हे ओबीसी आणि वंचित समूहातील असतील. दोन तीन दिवसांत आमची पूर्ण यादी जाहीर होईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *