कोकण महोत्सवातून झाला बोलीभाषेचा जागर
ठाणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कवितांसह कोकण विषयक रंजक माहिती, मालवणी कविता, गाऱ्हाणे, देवस्थाने, साहित्यिक, फळे, कोकणी इरसाल नमुने, सण-उत्सव-
लोककला, परंपरा, कलाकार, गडकिल्ले, समुद्र, किनारे, पर्यटन, निसर्ग संपदा, खाद्यसंस्कृती आणि समृद्धी यावर सुबक विवेचन कोकण महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या काव्योत्सवातून उलगडण्यात आले.
यावेळी सहभागी कवींनी आपल्या कवितेतून कोकण संस्कृतीचे दर्शन सावरकरनगर येथील काव्य रसिकांना घडविले. विठ्ठल उमप खुला रंगमंचावर हा काव्योत्सव रंगला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर विद्यमाने शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांनी सावरकरनगर, शाळा क्रमांक १२० च्या पटांगणात आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात शुक्रवारी आम्ही कला प्रतिष्ठानच्या ११ कवी-कवयित्रींनी बोलीभाषेचा जागर केला.
प्रा. रक्षा माहिमकर, प्रा. मंदार टिल्लू, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के आणि कवी विनोद पितळे यांच्या हस्ते या काव्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राक्षे आणि टिल्लू यांनी प्रथमच सावरकरनगर येथे संपन्न झालेल्या कवीसंमेलन आयोजित केल्याबद्दल बारटक्के यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पितळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत गाव असा नि माणसं अशी, नाती गोती जडतं जशी अशा काव्यपंक्ती सादर करीत त्यांनी सांगितले की, नाती गोती जोडणारी माणसं म्हणजे कोकणची माणसं. कोकणची माणसं साधी भोळी या पलिडेही कोकण समृद्ध आहे. तेथे औद्योगीकरण झाले आहे, पर्यटन क्षेत्र विकसीत झाले आहे.
प्रा. डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी काव्योत्सवाची धूरा सांभाळली. आपल्या निवेदनातून त्यांनी कोकण विषयक रंजक माहिती दिली. कवी विजय जोशी यांनी ‘तुझ्या बोलण्या वागण्यात कसलाच ताळमेळ नसता मग मी बोललाय की माझं ताँड दिसताय’ ही मालवणी भाषेतील समाजातील अन्यायावर भाष्य करणारी कविता सादर केली. कवयित्री सुप्रिया हळबे यांनी गावाकडच्या ओलावावर आधारीत ‘नेसून शालू हिरवाईचा, गाव गोजिरे होते वसले’, कवयित्री हर्षदा अमृते यांनी दिंडी वृत्तातील ‘दागिन्यांचा ना सोस पैठणीचा, लोभ आहे आजन्म सोबतीचा’ ही गझल, कवी मनमोहन रोगे यांनी ‘मुंबई, ठाणे मराठी रवली नाही, आम्ही नव्हतो दक्ष, कोकण हातचा निसटत चालला, खया तुमचं लक्ष’, कवी रामदास खरे यांनी ‘तुम्ही अगदी सहजपणे घराविषयी काही विचाराल आणि आम्ही भान हरपून घराच्या आठवणीत बुडून जाईल’
अश्लेषा राजे यांनी कोळी भगिनींचे नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त वर्णन करणारी ‘चला चला गं सयांनो, आली पुनव श्रावणी,दर्या उधाण मातला करुन नवस फेडाणी’, कवयित्री मनिषा चव्हाण यांनी ‘स्वप्नामध्ये लागे चाहुल, तुझा चेहरा पानोपानी, तुला वाचता पुन्हा पुन्हा मी, मनी मनीषा ओठी गाणी’, डॉ. सतिश कानविंदे यांनी ‘येवा येवा लवकर घेवा, माझा या ताजा मालवणी खाजा’, राजेंद्र ठाकूर यांनी ‘चला देवांचे दर्शन घेऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया’ या कविता सादर करण्यात आल्या. शेवटी या अकरा कवी कवियित्रींना गाऱ्हाणं सादर करुन काव्योत्सवाचा समारोप केला. The Konkan Festival brought about the revival of the dialect
ML/KA/PGB
25 Nov 2023