या राज्यांमध्ये ‘द केरला स्टोरी’वर बंदी

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या देशात दोन गट पडले आहेत. देशातील भाजपप्रणित काही राज्य या चित्रपटाला पाठींबा देत आहेत तर काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली आहे. काही राजकीय नेते या चित्रपटाचे मोफत शोज आयोजित करत आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. तर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये बंदी घातली आहे. या बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात 12 मे रोजी सुनावणी होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने ही याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील हरीश साळवे यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिल्याच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणीसाठी १५ मे ही तारीख निश्चित केली आहे. साळवे यांच्या याचिकेवर त्याच दिवशी सुनावणी घेण्यासही खंडपीठाने सांगितले. मात्र बंदीमुळे आम्हाला दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे साळवे यांनी सांगितले, त्यानंतर न्यायालयाने 12 मे रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले.
दरम्यान ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली. यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी 15 मे ही तारीख निश्चित केली आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते- चित्रपट चांगला आहे की नाही, हे मार्केट ठरवेल.
विपुल शहांची निर्मिती असलेल्या आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करत आहे.
SL/KA/SL
10 May 2023