वित्तीय तूट कमी करणारा आणि कर रचनेत बदल नसणारा अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत वर्ष २०२४ चा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कर रचनेत (Tax slab) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगत सध्या प्राप्तिकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरित जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये महिला, आरोग्य आणि तरुण आणि गरीब यांसाठी प्रामु्ख्याने तरतूदी करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत”,
“गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक घराला पाणी, वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली आहे. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे”, असेही निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केले.
आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा
- अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीकरण वाढवण्याची घोषणा केली. या रोगाचा सामना करण्यासाठी, 9-14 वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण केले जाईल.
- अंगणवाड्या आणि पोषण 2.0 योजनेला पोषण वितरण, अर्ली चाइल्डहुड केअर आणि विकास प्रदान करण्यास आणखी गती दिली जाईल.
- मिशन इंद्रधनुषचे लसीकरणाचे प्रयत्न U-WIN प्लॅटफॉर्मद्वारे पुढे नेले जातील.
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल.
या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी महिलांच्या विकासावर विशेष भर दिला. त्यासाठी सरकार येणाऱ्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. लखपती दीदींवर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की ९ कोटी महिला ८३ लाख बचत गटांमध्ये सामील होऊन सामाजिक वातावरण बदलत आहेत. यामुळे महिलांच्या जीवनात बदल झाला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, आतापर्यंत सुमारे १ कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. ती लोकांसाठी प्रेरणा बनत आहे. लखपती दीदींना २ कोटींवरून ३ कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेने ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल घडून येईल.
अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महिलांसाठी विशेष मुद्दे
- गेल्या १० वर्षात महिलांच्या विकासावर सरकारचे विशेष लक्ष
- उच्च शिक्षणात महिला आणि मुलींची नोंदणी वाढली
- मुद्रा योजनेअंतर्गत ३० कोटी महिलांना कर्ज
- उद्योजकतेच्या मदतीने महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न
- तिहेरी तलाक बेकायदेशीर केला, कडक कायदा आणला
- देशातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ३३ % आरक्षण विधेयक
- लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट २ कोटींवरून ३ कोटींवर
- सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारतचे फायदे
- पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरे
- नऊ कोटी महिला उद्योजकांचे देशाच्या जडणघडणीत योगदान
अन्य महत्त्वाच्या तरतूदी
- आर्थिक वर्ष 25 मध्ये 11.1 लाख कोटी कॅपेक्स जाहीर केले
- रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज.
- ऊर्जा, खनिजे, सिमेंटसाठी 3 रेल्वे कॉरिडॉर
- 40,000 रेल्वे डबे वंदे भारत स्वरूपात रूपांतरित केले जातील.
- छोट्या शहरांना जोडण्यासाठी 517 नवीन मार्गांवर ‘उडान’ योजना
- 2030 पर्यंत 100 लाख कोटी टन कोळसा गॅसिफिकेशनचे लक्ष्य
- तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जाईल.
- ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या पुढील 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील
SL/KA/SL
1 Feb. 2024