राममंदिराचे लोकार्पण हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली

 राममंदिराचे लोकार्पण हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी २२ जानेवारीला बाळासाहेबांचे स्वप्न असलेल्या राममंदिराचे लोकार्पण होणे, ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, प्रभू श्रीराम त्यांना सद्बुद्धी देवो असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.मुंबईतील बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सरकार आम्ही स्थापन केले. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही समाजातील सर्व घटकांना, महिला, शेतकरी, युवावर्ग, अबालवृद्धांना न्याय देण्याचे काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांगीण विकासाला आणि स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य द्यायचे म्हणून त्यांच्या नावाने आपण ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग’ सुरु केला. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु केला.

‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरु केला. ज्याचा लाभ आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी अनेक निर्णय घेतले. अनेक योजना सुरु केल्या. अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. अयोध्येमध्ये राममंदिर पूर्ण झाले आणि काल २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राममंदिराचे लोकार्पण झाले, ही बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरली असे मुख्यमंत्री म्हणाले .

आज बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण. म्हणून आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेतर्फे ११ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केले. आज बाळासाहेब भवन येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले,त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले. निवडणूक एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. म्हणून राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही ते सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. आज ते आमचा विरोध करतात, आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे सर्व जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला, त्यांना रामाबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही. जो राम का नही, वह किसी काम का नही. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल. सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो हीच प्रभू श्रीरामाजवळ प्रार्थना करतो असे शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षण देणारच

मराठा आरक्षणाबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे. ओबीसी समाज तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. ही सरकारची जबाबदारी आहे. संपूर्ण मागासवर्ग आयोग त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये त्यासाठी काम करत आहे. दीड लाख लोक त्यासाठी काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिटयूट त्यासाठी काम करत आहेत.

या आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा सरकार करणार आहे. ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. हा शब्द सरकारने दिलेला आहे. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. पूर्ण प्रक्रिया आपण करतोय. सर्वेक्षण सुरु आहे. म्हणून मराठा आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, की सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. हे सरकार देणारे आहे. म्हणून मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका न घेता संयम बाळगावा व सरकारला सहकार्य करावे. हीच आमची विनंती आहे, हीच आमची अपेक्षा आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ML/KA/SL

23 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *