मानवाच्या जीवनात नदीचे असलेले महत्त्व छायाचित्रांतून स्पष्ट
पुणे, दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक नदीच्या काठावर एक संस्कृती आहे. प्रत्येक नदीसोबत एक पारंपरिक कथा आहे; परंतू आता काळानुरूप तिचे महत्त्व कमी झाले आहे. या प्रदर्शनात पुण्यातील नदीकाठांवर असलेल्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचे अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला नदीचे महत्व समजेल अशी छायाचित्रे रेखाटलेली आहेत. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे.
याविषयाबाबत पुढाकार घेऊन समाजात जागृती निर्माण करण्याचे सुंदर कार्य या प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्था करत आहेत. नदीचे पाणी तसेच तिच्या भोवतालचा परिसर हा स्वच्छ आणि सुंदर असणे अपेक्षित आहे. यासाठी विधिमंडळातून वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
जागतिक नदी दिवसानिमित्त, पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, नदीचा जीव कशात? याविषयांतर्गत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन २४ ते २६ सप्टेंबर पर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये मराठी विज्ञान परिषदे तर्फे शालेय विद्यार्थ्यांची ” नदीचा जीव कशात?” ही पोस्टर स्पर्धेमधील निवडक पोस्टर , विकी कॉमन्स कडून CIS A2K तर्फे फोटो स्पर्धा, तसेच अर्बन स्केचर्स तर्फे नदी काठ आणि वारसा स्थळे, जलरंगातील विविध कलाकारांची नदीकाठाची चित्रे असे नदी विषयक कलाकृतींचा समावेश आहे.
या प्रदर्शनाला काल डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली.
यावेळी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांचे कौतुक करत स्वयंसेवकांच्या बरोबर फोटो काढले. तसेच तुम्ही छान काम करत आहात, मी तुमच्या बरोबर आहे अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी दिल्याने उपस्थित सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या साधेपणाचे स्वयंसेवकांना कौतुक वाटले.
जागतिक नदी दिवनिमित्ताने नदीचा जीव कशात? प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध नदी तज्ञ विजय परांजपे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात पुणे रिव्हर रिव्हायवल, जीवितनदी, मराठी विज्ञान परिषद, अर्बन स्केचर्स पुणे, CIS A2K यांसह पुण्यातील विविध NGO चा सक्रीय सहभाग होता. शहरातील मान्यवर, मुलांचे पालक तसेच नदीप्रेमींनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
प्रसिद्ध फोटोग्राफर चंद्रशेखर बापट यांनी उत्तम फोटो काढण्याच्या तंत्रावर मार्गदर्शन केले.
जीवितनदीच्या मृणाल वैद्य यांनी मुलांनी काढलेली चित्रे, आशय आणि सादरीकरणाचे निकष सांगितले. विजय परांजपे यांनी नदीच्या उगमाचे महत्व शास्त्रीय, सांस्कृतिक द्रृष्ट्या आणि आज आपण पाहतो ते कसे वेगळे आहे , नदीची कोट्यावधी वर्षांपासून ची परिसंस्था, नदीचे वेगवेगळे टप्पे, संगमांचे महत्व, उगम, पूर, पठार आणि मुख या अवस्था रंजक शैलीत सांगितल्या. गंगा पुनर्जीवन आराखडा हा देशातील सर्वच नद्यांचा कसा आहे. कारण गंगा म्हणजेच प्रवाह, त्यामुळे हा आराखडा देशातील सर्वच नद्यांसाठी कसा बनवला आहे हे स्पष्ट केले.
ML/KA/SL
25 Sept. 2023