कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वत:च्या तेराव्याला झाले हजर
![कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वत:च्या तेराव्याला झाले हजर](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/01/Kumbh-1.jpg)
लखनऊ,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये दररोज कोट्यवधी भाविक उपस्थित राहत आहेत. प्रचंड प्रमाणात अखंडपणे लोटणाऱ्या या जनसागराचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने उत्तम व्यवस्था ठेवूनही या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊन ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेकजण हरवले होते. त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. ज्या लोकांचा ठावठिकाणा लागलेला नाही त्यांनी आपापल्या आप्तांचे दिवसकार्य करत आहेत. अशा गोंधळलेल्या स्थिती चेंगराचेरींत वाचलेले आपले आप्त अजूनही घरी येतील अशी आशाही लोकांना लागून राहीली आहे. अशीच एक आशादायी घटना लखनऊ येथे घडली आहे. स्थानिक रहिवासी खुंटी गुरु बेपत्ता होते. चेंगराचेंगरीत खुंटी गुरु यांचा मृत्यू झाला असावा असं समजून शेजाऱ्यांनी त्यांचे अंत्यविधी सुरु केले. तेरावं झाल्यावर संध्याकाळी जेवणाची तयारी सुरु होती. त्याचवेळी खुंटी गुरु तिथे सदेह प्रकटले. त्यांना पाहून शेजाऱ्यांचा आनंद ओसांडून वाहू लागला. सुतकी वातावरण क्षणात पालटलं आणि आनंदोत्सव सुरु झाला. ब्राह्मण भोजनाची तयारी सुरु असताना खुंटी गुरु अचानक तिथे पोहोचले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली
खुंटी गुरु यांच्या कुटुंबात कोणीच नाही. ते एकटेच राहतात. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते एक दिवस आधी म्हणजेच २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले. २९ जानेवारीला संगमस्थळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. तेव्हापासून खुंटी गुरु बेपत्ता होते. आसपासच्या लोकांनी खुंटी गुरु यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. चेंगराचेंगरीत खुंटी गुरु यांचा मृत्यू झाल्याचं समजून शेजारच्यांनी मृत आत्म्याच्या शांतीसाठी लहानशी प्रार्थना आयोजित केली. त्यानंतर ब्राह्मण आणि स्थानिकांना जेवण देण्याची तयारी केली जात होती.
SL/ML/SL
15 Feb. 2025