राज्यसभेच्या सहाही जागा महायुती लढविण्याच्या तयारीत

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. या सहाही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून भाजपाने त्यासाठी चौथा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या राज्यातून निवृत्त होणाऱ्या सहा जणांमध्ये भाजपाच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन यांचा समावेश आहे तर उर्वरित प्रत्येकी एक जागा अनिल देसाई शिवसेना (उबाठा), कुमार केतकर काँग्रेस आणि वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी आहे. यापैकी शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडे आवश्यक असणारे प्रत्येकी ४१ आमदार नसल्याने त्यांचा कोणीही निवडून येऊ शकत नाही.
निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या कडे तर राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या कडे सोपविले असून त्यांचेच पक्ष आदेश लागू होतील असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे, पैकी शिवसेनेचा आधीच दिला असून राष्ट्रवादीचा ही पुढील दोन दिवसात अपेक्षित आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) यांच्या कडे असणाऱ्या आमदारांना मूळ पक्षाने काढलेला आदेश मानायचा की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या दोन्ही गटांनी तो मानणार नाही असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात काय करतात ते पाहावे लागेल.
काँग्रेस कडे आवश्यक आमदार संख्या असल्याने त्यांचा एक सदस्य निवडून येऊ शकतो मात्र महायुती त्यात ही भाजपाने आजवर डावपेच आखून अशा निवडणुकीत दिलेले धक्के प्रत्यक्षात वेगळे चित्र निर्माण करू शकतात , यामुळेच भाजपा आपला चौथा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. भाजपाने केंद्रीय नेतृत्वाकडे नऊ नावांची शिफारस केली असून त्यात नारायण राणे, माधव भंडारी, विनोद तावडे, संजय उपाध्याय, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर , चित्रा वाघ आणि अमरीश पटेल यांचा समावेश आहे.
यातून कोणाचीही नावे केंद्रीय नेतृत्वाने नक्की केली तरी महायुती त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून मिलिंद देवरा यांचे नाव जवळपास नक्की आहेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचेकडून अजून काही स्पष्ट झालेले नाही, आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून गरज पडल्यास २७ फेब्रुवारीला मतदान केले जाईल.
ML/KA/SL
8 Feb. 2024