कंत्राटीकरणाचा शासन निर्णय वंचितांच्या एकजुट लढ्यामुळे रद्द
पुणे दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात शिंदे – भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेत या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला होता व सरकारला इशारा दिला होता की, वंचित-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कदापि खेळू देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या निर्णयाविरोधात राज्यभर प्रभावी आंदोलने करत या निर्णयाविरोधात रान उठवले होते. अखेर सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला.
यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, “आज एक महत्वाचा निर्णय आपल्यासमोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये क्लास वन ते क्लास फोर ऑफिसर्स आणि बाकीचे शासकीय कर्मचारी यांची जी कंत्राटीपध्दतीने भारती होणार होती, तो निर्णय मागे घेतलेला आहे हा एक आनंदाचा टप्पा महाराष्ट्राच्या राजकारणातला आहे असं मी मानतो.
वंचित बहुजन आघाडीने नांदेड, परभणी,अकोला, सांगली, लातूरसह राज्यभरात आंदोलन केले होते आणि आज त्या आंदोलनाचे यश आपल्या सर्वांना मिळत आहे. आज एका पातळीवरती वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे विद्यार्थी जे या आंदोलनात न घाबरता सहभागी झाले आणि सगळे कोचिंग क्लासेस चालवणारे प्राध्यापक, शिक्षक यांनी न घाबरता भूमिका घेतली आणि आंदोलनाला यश आणण्याचे काम केले. त्या सगळ्यांचे आभार मानतो.
सरकार कोणाचेही असो जर ते इथल्या गोरगरिबांच्या, कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या, तरुणांच्या आणि तमाम वंचित बहुजन समाजातून आलेल्या तरुणांच्या विकासाच्या आणि जीवनाशी जर ते आडवे आले, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना आडवे करण्याच काम करेल. ज्याप्रकारे आपण कंत्राटीकरनाचे आंदोलन उभे केले, ते मार्गी लावलं आणि सरकारला आपल्यापुढे झुकवून तो जीआर मागे घ्याला लावला. त्याच पध्दतीने आम्ही यापुढे सुद्धा इकडच्या तरुणांच्या समस्यांवरती आवाज उचलू व त्यावर मात करण्यासाठी काम करू, असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
ML/KA/SL
20 Oct. 2023