सरकार करणार समृद्धीवरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास …

 सरकार करणार समृद्धीवरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास …

बुलडाणा, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार उपाययोजना प्राधान्याने अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात 26 जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहे. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भेट दिली.

यावेळी मंत्री गिरीश महाजन, संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार , अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक आणि प्राधान्याने करण्यात येतील. अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी पोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाला समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. यामुळे प्रवाशांची आणि वाहनचालकांची नाराजी होते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक नियंत्रण केले जात आहे.अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. अपघातातील जखमींना योग्य तो उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ML/KA/SL

1 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *