सरकारने बहुचर्चित ‘Cow Hug Day’ आदेश घेतला मागे
नवी दिल्ली,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन विक चा जल्लोश सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे Cow Hug Day म्हणजेच गाईला आलिंगन देण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे अजब लेखी आवाहन केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशु कल्याण विभागाकडून करण्यात आले होते. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करत हे आवाहन आता मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
Cow Hug Day चे आवाहन का करण्यात आले होते
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ असे या पत्रात म्हणण्यात आले होते.
‘मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे, असे या पत्रात म्हटले आहे. गायीला मिठी मारण्याचा दिवस साजरा करा, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते.
SL/KA/SL
10 Feb. 2023