सरकारने केले परवीर सिंग यांना दोषमुक्त, सेवाही बहाल
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि ठाण्यातील आपल्या कामगिरी मुळे कायम वादग्रस्त ठरलेले निवृत्त पोलीस आयुक्त डॉ परमवीर सिंग यांना दोषमुक्त करीत राज्य सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले असून त्यांची निलंबन काळातली सेवाही पुन्हा बहाल केली आहे.
डॉ सिंग हे ठाण्यात आणि विशेषतः मुंबईत आयुक्त म्हणून कार्यरत असताना चांगलेच वादग्रस्त ठरले होते, अँटिलिया स्फोटके प्रकरणी अटकेत असणाऱ्या सचिन वाझे यांची लायक नसताना केलेली विशेष गुन्हे शाखेतील नियुक्ती , तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी केलेले 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप,नंतर चौकशीत केलेले घुमजाव अशा असंख्य प्रकरणांचा समावेश त्यांच्या कारकिर्दीत आहेत.
देशमुख यांच्यावर आरोप करून स्वतःच पळून जाऊन बेपत्ता होणारा हा मुंबईचा पहिलाच पोलीस आयुक्त ठरला होता. याच काळात देशमुखांवरील आरोपांमुळे त्यांचे निलंबन करून त्यांची चौकशी तत्कालीन मविआ सरकारने सुरू केली होती. सुमारे चार पाच महिने गायब असणाऱ्या सिंग यांचा तपास मुंबई पोलिसांना लागला नव्हता हेही विशेषच होते. त्यानंतर सिंग न्यायालयासमोर हजर झाले, त्यांना अटकपूर्व जामीन ही मिळाला , चौकशी आयोगासमोर हजर राहून आपल्याकडे देशमुखांवरील आरोपांचे पुरावेच नाहीत असेही त्यांनी सांगितले, आपल्या निलंबन आणि चौकशी ला त्यांनी न्यायालयात तसेच प्रशासकीय न्यायाधिकारणात आव्हान दिले होते. त्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या आधारे त्यांच्यावरील सर्व चौकशा बंद करून त्यांचे प्रकरण कायमचे बंद करीत त्यांची निलंबन काळातील सेवा कायम ठेवीत त्यांना सर्व लाभ मिळवून देण्याचे आदेश आज सरकारने जारी केले आहेत.
ML/KA/SL
12 May 2023