कोकणचा सुवासिक हापूस थेट देशाच्या राजधानीत!

 कोकणचा सुवासिक हापूस थेट देशाच्या राजधानीत!

मुंबई दि ७ — कोकणच्या सुपीक मातीतून साकारलेला, जगभर प्रसिद्ध असलेला हापूस आंबा आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत, देशाच्या राजधानीत पहिल्यांदाच भव्य “हापूस आंबा महोत्सवाचे” आयोजन करण्यात येत आहे.

हा महोत्सव 30 एप्रिल (अक्षय तृतीया) आणि 1 मे (महाराष्ट्र दिन) या दोन दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणार आहे. यामध्ये कोकणातील नामवंत आंबा बागायतदार, प्रगतिशील फळ प्रक्रिया उद्योजक, तसेच पारंपरिक कोकणी उत्पादक सहभागी होणार आहेत. या महोत्सवात हापूस आंब्याबरोबरच फणस, काजू, जांभूळ, करवंद आणि अशा अनेक कोकणातल्या खास फळांचे व त्यावर आधारित उत्पादनांचे आकर्षक प्रदर्शनही होणार आहे.

कार्यक्रमासाठी खास निमंत्रित
या भव्य कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री, खासदार, आयएएस अधिकारी, दिल्लीतील मराठी उद्योजक, फळ व्यापारी, आणि मराठी समाजातील मान्यवर व्यक्तिमत्त्वे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

कोकणच्या विकासाची दिशा:

या उपक्रमामार्फत कोकणातील फलोत्पादन क्षेत्रास राष्ट्रीय पातळीवर एक ओळख मिळणार असून, कोकणच्या प्रगतिशील शेतकरी व उद्योजकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, राष्ट्रपती व विविध मान्यवरांशी थेट संवाद साधणार आहे. यामध्ये कोकणच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा होणार असून, भविष्यातील धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

पूर्वतयारी:

या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मातोश्री क्लब, जोगेश्वरी येथे एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र वायकर होते. यावेळी मनीषा वायकर, ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव, प्रगतिशील आंबा बागायतदार, तसेच कोकणातील फलप्रक्रिया व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी आंबा एक्सपोर्टर डॉक्टर दीपक परब ,ग्लोबल कोकणचे नरेंद्र बामणे, देवगडचे अंबा बागायतदार वारिक, प्रसाद मालपेकर, रत्नागिरी आंबा बागातदार दीपक उपळेकर, राजश्री यादवराव, आणि अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

हापूससाठी स्वतंत्र मार्केटिंग व्यासपीठ:

या महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षीपासून कोकणातील शेतकऱ्यांना त्यांच्या अस्सल हापूस आंब्याचे देशभरात प्रचार आणि विक्रीसाठी स्वतंत्र होलसेल मार्केट आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे कर्नाटकहून येणाऱ्या नकली हापूस आंब्याची भेसळ थांबवता येणार असून, शुद्ध आणि दर्जेदार कोकणचा हापूस मुंबई, पुणे आणि देशभरातील ग्राहकांपर्यंत थेट पोहोचेल.

संपर्क:
विजय – +91 87798 42009

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *