हृद्यात झालेली रक्ताची गाठ काढण्याची पहिलीच शस्त्रक्रिया
ठाणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यात राहत असलेल्या २३ वर्षीय तरूणीच्या हृद्यात रक्ताची गाठ होऊन तिच्या जीवाला धोका झालेला होता. मात्र ठाण्यातील प्रसिध्द हृद्यरोगतज्ञ डॉ. मयुर जैन यांच्या देखरेखीखाली झालेल्या शस्त्रक्रियेने कॅथेटर वापरून हृदयातील रक्ताची ही गाठ काढून टाकण्यात आली. अश्या प्रकारची शस्त्रक्रिया भारतात पहिल्यांदाच झाली असल्याचा दावा डॉक्टरानी केला आहे.
२३ वर्षीय या तरूणीला अचानक श्वास घ्यायला त्रास होत होता आणि सारखी धाप लागत होती. सुरूवातीला फुफ्फुसात काही संसर्ग असेल अश्या शक्यतेने सदर तरूणीला व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. तिच्या हृदयाची तपासणी केली असता त्याचे पंपींग १५ टक्केपर्यंत सुरू असल्याने हार्ट फेल्युअर गटात ही केस येत होती.
हृदयाच्या चार चेंबरपैकी एका चेंबरमध्ये रक्ताची गाठ जमा झाल्याचे २ डी इकोत स्पस्ट झाले. ही गाठ जर पुढे फुफ्फुसाच्या दिशेने सरकली असती तर, तिकडे होणारा रक्तपुरवठा बंद होण्याची भिती होती परिणामी श्वास घेण्यास खूप अडचणी होऊन स्थिती गंभीर झाली असती.
अश्या गंभीर स्थितीत सदर रूग्ण घोडबंदर रोडवरील जिनकुशल हार्ट हॉस्पीटलमध्ये दाखल झाला. जिनकुशल हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. मयुर जैन यानी तपासणी केली असता थेट हृदयात गाठ झाल्याने तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुरूवातीला रक्त पातळ करण्याचे औषध दिली गेली. सदर रूग्णावर ओपन हार्ट सर्जरी करून गाठ काढण्याची देखील शक्यता तपासण्यात आली. मात्र रूग्णाचे वय आणि ऑपरेशनचा धोका लक्षात घेता डॉ. मयुर जैन यानी कॅथेटर वापरून ही रक्ताची गाठ कॅथेटरच्या सहाय्याने काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याला सदर रूग्णाच्या नातेवाईकानी होकार दिला. रूग्णाला व्हेंटीलेटरवर देखील न ठेवता लोकल एनास्थेशिया देऊन पायातील नसमधून कॅथेटर हृद्याच्या दिशेने सरकवण्यात आला.
शस्त्रक्रियेच्या वेळी २ डी इको, सोनोग्राफी सुरू ठेऊन डॉ.मयुर जैन यानी कुशलतेने हृद्यात जमा झालेली रक्ताची गाठ कॅथेटरमधून शोषून घेऊन काढून टाकली. तीन तास चाललेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सदर तरूणीला तीन दिवस देखरेखीखाली ठेऊन सोडण्यात आले.
कॅथेटर वापरून हृद्यातील रक्ताची गाठ काढून टाकण्याची अश्या प्रकारची शस्त्रक्रिया भारतात पहिल्यांदाच झाली असल्याचा दावा डॉ. मयुर जैन यानी केला. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या तीन दिवसानीच सदर तरूणीला घरी पाठवण्यात आले आणि तिची तब्येतही आता सुधारत आहे.
ML/KA/SL
6 Oct. 2023