IMA तून उत्तीर्ण झालेली पहिली महिला लष्करी अधिकारी : मराठी मुलीने केला विक्रम
डेहराडून, दि. 16 : येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 93 वर्षांच्या गौरवशाली परंपरेत एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरची 23 वर्षीय सई जाधव ही अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली आहे. 1932 मध्ये स्थापन झालेल्या या प्रतिष्ठित अकॅडमीमधून आतापर्यंत 67,000 पेक्षा जास्त अधिकारी बाहेर पडले, मात्र त्यात एकही महिला नव्हती. सईच्या यशामुळे ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून, भारतीय लष्कराच्या इतिहासात नवा मैलाचा दगड ठरला आहे. सई जाधव ही लष्करी परंपरेतून आलेली चौथी पिढी आहे. तिचे पणजोबा ब्रिटिश लष्करात, आजोबा भारतीय लष्करात अधिकारी होते, तर वडील संदीप जाधव आजही देशसेवेत कार्यरत आहेत. आता सईनेही गणवेश परिधान करून देशसेवेसाठी सज्ज होत आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे नेली आहे.
तिच्या कमिशनिंग सेरेमनीत आई-वडिलांनी स्वतः तिच्या गणवेशावर स्टार्स लावले, हा क्षण केवळ वैयक्तिक विजय नव्हता तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. सईची नियुक्ती टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून झाली असून, आयएमएतून उत्तीर्ण होऊन या दलात सामील होणारी ती पहिली महिला अधिकारी ठरली आहे. सईने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा व सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड पार करून विशेष सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हा मान मिळवला. तिच्या बॅचमध्ये 16 टेरिटोरियल आर्मी कॅडेट्स होते, त्यात ती एकमेव महिला होती.
महत्त्वाचे म्हणजे, आयएमएने जाहीर केले आहे की जून 2026 पासून महिला कॅडेट्स नियमित प्रशिक्षण व परेडमध्ये सामील होणार आहेत, ही लष्करातील लिंगसमतेसाठी मोठी पायरी ठरणार आहे. सई जाधवचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर देशभरातील लाखो मुलींसाठी प्रेरणादायी आहे. तिने दाखवून दिले की स्वप्न मोठे असले तरी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने ते नक्कीच पूर्ण करता येतात.
सई जाधवचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर विशेष परवानगीने इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 6 महिन्यांचे अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण तिने पुरुष कॅडेट्सच्या बरोबरीने आणि त्याच निकषांवर पूर्ण केले आहे. पदवीनंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची पायरी गाठली आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर आयएमए मध्ये स्थान मिळवले.
सईचे प्राथमिक शिक्षण बेळगावमध्ये झाले असून वडिलांच्या लष्करी बदल्यांमुळे तिला विविध राज्यांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. सध्या भारतीय सैन्यात महिलांसाठी अनेक नवीन मार्ग खुले केले जात आहेत. सई जाधवच्या या यशामुळे लष्करातील महिलांच्या वाढत्या महत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक लष्करी दिग्गजांनी सईच्या या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले आहे की, हे यश येणाऱ्या पिढ्यांमधील हजारो मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय लष्करातील वाढत्या गुणवत्तेचे आणि बदलांचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचेही मानले जात आहे.
SL/ML/SL