समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून सुरू

 समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून सुरू

मुंबई, दि. २ : समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा गुरुवार ५ जूनपासून प्रवाशांसाठी खुला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यानंतर इगतपुरी ते आमने हा ७६ किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला करण्यात आला. त्यानंतर शिर्डी ते भरवीर (८० किमी) आणि भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) हे टप्पे टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले.

मुंबई ते नागपूर जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी एमएसआरडीसीने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. यातील ६२५ किलोमीटरचा भाग आधीच खुला झाला होता. आता शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर केवळ आठ तासांत पोहोचता येणार आहे. महामार्गाचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते. एप्रिलमध्ये एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे लोकार्पणासाठी वेळ मागितली होती. या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठवण्यात आला होता. प्रारंभी हा शेवटचा टप्पा १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी खुला करण्याचे नियोजन होते, मात्र पंतप्रधानांची वेळ न मिळाल्यामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *