लवकरच पुन: प्रदर्शित होतोय ‘शोले’ चित्रपट
मुंबई, दि. 17 : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि आजही आवडीने पाहीला जाणारा ‘शोले’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी देशभरातील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे पुन:प्रदर्शन होणार असून सिनेरसिकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
१९७५ साली प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी आणि अमजद खान यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गब्बर सिंगचा संवाद “अरे ओ सांबा” ते जय-वीरूची मैत्री, बसंतीचे नृत्य आणि ठाकूरची शपथ – हे सर्व प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात ताजे आहेत. या पुन:प्रदर्शनासाठी चित्रपटाचे डिजिटल रीमास्टरिंग करण्यात आले असून ध्वनी व दृश्य अधिक आधुनिक तंत्रज्ञानाने सजवले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीला ‘शोले’चा अनुभव अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने घेता येणार आहे.
चित्रपटगृह मालकांच्या मते, ‘शोले’च्या पुन:प्रदर्शनामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि नव्या प्रेक्षकांना भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ अनुभवता येईल. सोशल मीडियावर चाहत्यांनी आधीच उत्साह व्यक्त केला असून अनेकांनी तिकीट बुकिंग सुरू केले आहे. १२ डिसेंबर २०२५ हा दिवस भारतीय सिनेमाच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा ‘शोले’च्या जादूचा आनंद घेण्याचा ठरणार आहे.
SL/ML/SL