गणपतीपूर्वी होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कोल्हापुरात सांगितलं.
राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सुनील तटकरे बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. ईडी ला घाबरून आम्ही महायुतीत गेलो हा शरद पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचं तटकरे यांनी पत्रकारांना सांगितलं
शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो. पण आम्ही देखील पक्षांनं दिलेली जबाबदारी पार पाडली.पक्ष वाढीसाठी आमचा देखील खारीचा वाटा आहे, असंही तटकरे म्हणाले. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांनी याआधीच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईचं पत्र दिलं आहे. या संदर्भातील पुढील प्रक्रिया सुरु असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
महाविकास आघाडी मध्ये सामील होताना शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असं होत नाही.आम्ही आमचा विचार बदलला नाही. आमच्या विचारानं आम्ही पुढे चाललो आहोत, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी आमच्या सोबत सामील होण्याबाबत आज ही अपेक्षा आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.
अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे. काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे.उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेताहेत. हे सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहे.मला दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांची कीव येते, अशी टीका तटकरे यांनी यावेळी केली.
2004 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण का संधी गमावली माहीत नाही.आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सर्वांनाच वाटतं.ज्याचे जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल.आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही असंही पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी सांगितलं.
ML/KA/SL
10 Sept. 2023