देशाचा आर्थिक वर्षांचा विकासदर ७.२ टक्के
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (जीडीपी) सरलेल्या २०२२-२३ आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ६.१ टक्के वाढ नोंदवली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने काल जाहीर केलेल्या या आकडेवारीमुळे आता संपूर्ण आर्थिक वर्षांचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
कृषी क्षेत्र, निर्मिती क्षेत्र, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीपथ कायम असल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. चौथ्या तिमाहीतील या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ३.३ लाख कोटी अमेरिकी डॉलपर्यंत नेले आहे. पुढील काही वर्षांत पाच लाख कोटी डॉलरच्या लक्ष्याचा टप्पा आणखी समीप आल्याचेही या विभागाने स्पष्ट केले.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात २०२२-२३ संपूर्ण वर्षांसाठी सात टक्के विकासदर अपेक्षित होता. प्रत्यक्षात तो आता ७.२ टक्क्यांवर जाणार आहे. चौथ्या तिमाहीची कामगिरी ही अनेकांकडून व्यक्त केल्या गेलेल्या पूर्वानुमानापेक्षा चांगली नोंदवली गेली आहे. रिझव्र्ह बँकेने ५.१ टक्के वाढीचा, तर स्टेट बँक संसोधन संघाने ५.५ टक्के वाढीची अपेक्षा केली होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, स्थिर शहरी मागणी आणि वाढलेल्या सरकारी खर्चामुळे भारतीय अर्थव्यवस्था जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढण्याचे अनुमान होते. प्रत्यक्षात ती ६.१ टक्के नोंदवली गेली.
SL/KA/SL
1 June 2023