संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल आणि भाजपमधील वादाला पुन्हा तोंड फुटले
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा गोंडस शब्दां आडून संविधानावर हल्ला करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरात केला त्याला भाजपाने प्रत्त्युत्तर देत राहुल गांधी अराजक निर्माण करीत असून यामागे शहरी नक्षलवादी असल्याचे आरोप केला आहे त्यामुळे या निवडणुकीत नव्याने वादाला तोंड फुटले आहे.
राहुल गांधी आज नागपूरात संविधान सन्मान कार्यक्रमात बोलत होते. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग आहे. अशी जनगणना केली तर देशाचं चित्र स्पष्ट होईल. प्रत्येकाला समजेल की आपल्या हाती किती पैसा आहे, किती हक्क आहे, म्हणूनच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला विरोध करत आहे असा आरोप त्यांनी केला. काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणारच असं ते म्हणाले.
भाजपा नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राहुल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या विचारसरणीपेक्षा डाव्या विचारसरणीकडे अधिक झुकलेले असून, त्यांच्या भारत जोडो या समुहात कट्टरवादी विचारसरणीच्या अनेक संघटनांचा समावेश असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ते कोल्हापूर इथे वार्ताहरांशी बोलत होते. ज्या संविधानाचे पुस्तक राहुल गांधी सभांमध्ये दाखवत असतात, ते ही लाल रंगाचंच आहे, असा टोला त्यांनी लगावला.
अशा प्रकारच्या संघटनांच्या मदतीनं अराजक पसरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी महाराष्ट्रात शहरी नक्षलवादाला समर्थन देण्यासाठी आले आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करतात,असा आरोपही त्यांनी केला.
भाजपाने लाल रंगाच्या उपस्थित केलेल्या मुद्यावर कॉंग्रेसने टीका केली आहे. हिंदू संस्कृतीत पूजा अर्चेसाठी महत्त्वाच्या असलेल्या लाल रंगावर टीका करणाऱ्या भाजपाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असा प्रत्यारोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सत्तेसाठी हे लोक कोणत्याही थराला जात आहेत, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर केली. याचा जाब या निवडणुकीत त्यांना द्यावा लागेल असं ते म्हणाले.
ML/ML/SL
6 Oct. 2024