देशातील सामाजिक,राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय

नवी दिल्ली, 28 : देशातील सामाजिक राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांच्यासह विविध राज्यांतून आलेले नेते उपस्थित होते.
तसेच अर्थव्यवस्था आणि सामाजिक सलोखा वेगाने ढासळत असल्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कार्यकारिणीच्या बैठकीत सामाजिक—राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था असे दोन ठराव पारित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आव्हाड म्हणाले की, देशातील सामाजिक—राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. 2014 मध्ये 34 देशांना धान्य निर्यात करणा—या देशाला आता धान्य आयात करावे लागत आहे. 2012 मध्ये 34 हजार कोटीचा कापूस निर्यात करीत होता. हा आकडा आता सहा हजार कोटीवर आला आहे.
सध्या सत्ताधारी पक्षाकडून ज्या प्रकारे देश चालविला जात आहे तसा हा देश कधीच चालू शकत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सुरू आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून भविष्य खराब करण्याचे प्रयत्न केले जात आहे, असा आरोपही आव्हाड यांनी भाजपचे नाव न घेता केला.
राकॉच्या आमदारांना फोडण्यासाठी निधीगळ फेकला जात आहे. मात्र, आमदारांना पैश्याने खरेदी करण्याचा प्रकार एकदा यशस्वी होवू शकतो. परंतु, आता राकॉचे सर्व आमदार एकजूट असून पक्ष फोडण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी होणार नाही. राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी नसतात तर देशातील गरिब, शेतकरी, मजूर, महिला आणि बेरोजगारांच्या प्रगतीसाठी काय करता येईल यासाठी असतो, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
VB/ML/SL
28 March 2025